Prakash Abitkar – ‘सीपीआर’वर पालकमंत्र्यांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’: आरोग्य सेवा सुधारण्यासाठी ‘डेडलाइन’ निश्चित!

कोल्हापूर : छत्रपती प्रमिला राजे (सीपीआर) रुग्णालय हे कोल्हापूर जिल्ह्याचे मुख्य आणि गोरगरिबांचे आधारस्थान असलेले शासकीय रुग्णालय असताना, येथे रुग्णांना जीवदान देण्याऐवजी जीव धोक्यात घालण्याचे काम सुरू आहे काय, असा संतप्त आणि थेट सवाल पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर ( Prakash Abitkar ) यांनी रुग्णालय प्रशासनाला केला. योजना सर्वसामान्य जनतेसाठी असून, सीपीआर जिल्ह्याचे रुग्णालय आहे. परंतु, तुम्ही सगळे मिळून लोकांना मारत आहात, अधिकारी म्हणून तुम्ही महिना-महिना काम करत नाही; लोक रस्त्यावर मरतील काय? असा संताप व्यक्त करीत पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सीपीआरच्या प्रशासनाचे वाभाडे काढत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्काळ पदमुक्त करा, असे सक्त आदेशही त्यांनी अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर यांना दिले. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी सीपीआर अधिष्ठाता कार्यालयात बैठक घेतली. याप्रसंगी त्यांनी सर्व विभागप्रमुखांची कानउघाडणी केली.
सीपीआरमध्ये असलेल्या गैरसोयी, उपचारांमधील दिरंगाई आणि मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या त्रुटींची गंभीर दखल घेऊन पालकमंत्री आबिटकर यांनी प्रशासकीय बैठकीत आपला संताप व्यक्त केला. “हे जिल्ह्याचे सर्वात मोठे रुग्णालय आहे. इथे लोक उपचारांसाठी, जीव वाचवण्यासाठी येतात. पण सुविधांचा अभाव आणि निष्काळजीपणामुळे लोकांना मारायचे काम करत असाल, तर हे खपवून घेतले जाणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी ताशेरे ओढले. सीपीआरमधील प्रशासकीय कामकाज व रुग्णसेवेत होणाऱ्या हेळसांडीबाबत त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. सीपीआर येथे रुग्णांना उपचार देण्यात चाल-ढकल, तसेच तांत्रिक अडचणी येतात, अशा सातत्याने तक्रारी आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून ७५ वर्षांवरील रुग्णांवर दहा लाखांपर्यंत मोफत उपचार केले जातात. आता विशेष आजारात ५ ते २२ लाखांचे उपचार मोफत करण्यात येणार आहेत. जनआरोग्य योजनेतून उपचार देताना होणारा विलंब आणि चालढकल होत असल्याबाबत जिल्हा समन्वयक, आरोग्यमित्र व डॉक्टरांना पालकमंत्र्यांनी खडसावले.
समाजसेवा अधीक्षक तुम्हाला कोणी ओळखते का?
सीपीआरमध्ये समाजसेवा अधीक्षक हे पद आहे. येथे ११ कर्मचारी आहेत. मात्र, हे मलाही माहीत नाही आणि रुग्णांनाही याची कल्पना नाही. येणाऱ्या रुग्णांना मार्गदर्शन व मदत करणे अपेक्षित आहे. तुम्हाला कोणी ओळखते का? येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला तुमची मदत झाली पाहिजे. त्यासाठी समाजसेवा अधीक्षकांची केबिन सीपीआर आवारात उभी करा, त्यांचे मोबाईल नंबर स्पष्ट दिसतील असे लावा, येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना त्यांनी मार्गदर्शन करणे अपेक्षित असल्याचेही पालकमंत्री आबिटकर यांनी सुनावले.
पालकमंत्र्यांचे कठोर निर्देश
पालकमंत्री आबिटकर यांनी रुग्णालय अधीक्षकांसह सर्व विभाग प्रमुखांना खालीलप्रमाणे तातडीचे निर्देश दिले:
- २४ तासांत अहवाल: रुग्णालयात गेल्या आठवड्यात झालेल्या गंभीर घटना आणि रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संभाव्य त्रुटींचा सविस्तर चौकशी अहवाल पुढील २४ तासांत सादर करण्याचे आदेश.
- स्वच्छता व व्यवस्थापन: रुग्णालयाच्या आवारातील आणि वॉर्डांमधील स्वच्छतेचा प्रश्न ४८ तासांत सोडवावा. यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ त्वरित नियुक्त करावे.
- उपकरणे दुरुस्ती: बंद पडलेली अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे यांची यादी करून, ती १५ दिवसांत दुरुस्त करून कार्यान्वित करावीत.
- औषध पुरवठा: जीवनावश्यक औषधांचा आणि सर्जिकल साहित्याचा तुटवडा जाणवू नये यासाठी तातडीने खरेदी प्रक्रिया पूर्ण करावी. गरज पडल्यास जिल्हा नियोजन समितीकडून तातडीचा निधी उपलब्ध केला जाईल.
- उपस्थिती सक्तीची: सर्व वरिष्ठ डॉक्टरांनी त्यांच्या निर्धारित वेळेत रुग्णालयात उपस्थित राहणे सक्तीचे आहे. यापुढे अनधिकृत गैरहजेरी आढळल्यास सेवा पुस्तिकेत नोंद घेऊन थेट कारवाई केली जाईल.



