Krishnaraj Mahadik : पक्षादेश पाळणाऱ्या कृष्णराज महाडिक यांच्यावर भाजपची मोठी जबाबदारी! थेट राज्याच्या युवा मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई: राज्याच्या राजकारणात सध्या एकाच नावाची चर्चा आहे, ती म्हणजे कृष्णराज महाडिक. गेल्या काही काळापासून त्यांच्या राजकीय भूमिकेवरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली असतानाच, भारतीय जनता पार्टीने कृष्णराज महाडिक यांच्यावर राज्याची मोठी जबाबदारी सोपवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. भाजपकडून आज (ता.२४) रोजी राज्यातील नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये मुख्य प्रवक्ता, सरचिटणीस, चिटणीस, उपाध्यक्ष आणि भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अशा विविध पदांचा समावेश आहे. भाजपकडून कृष्णराज महाडिक यांची ‘भाजयुमो’ प्रदेशाध्यक्षपदी निवड करून त्यांना मोठी संधी दिली आहे.
विधानसभा आणि महापालिका निवडणुकीतील ‘ती’ माघार
काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी कृष्णराज महाडिक यांचे नाव चर्चेत होते. मात्र, पक्षाच्या आदेशाला शिरसावंद्य मानत त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर नुकत्याच झालेल्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतही पक्षाच्या धोरणानुसार त्यांनी एक पाऊल मागे घेणे पसंत केले.
विरोधकांची टीका आणि महाडिकांचा संयम
या सलग दोन माघारींनंतर राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर कृष्णराज महाडिक यांच्यावर टीकेची प्रचंड झोड उठली होती. “महाडिक बॅकफूटवर गेले”, “पक्ष त्यांना डावलत आहे” अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र, कृष्णराज महाडिक यांनी या टिकेला संयमाने उत्तर दिले आणि पक्षाच्या निष्ठेला सर्वोच्च स्थान दिले.
भाजपचा ‘मास्टरस्ट्रोक’: प्रदेशाध्यक्षपदी वर्णी
पक्षाच्या आदेशाचे पालन करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्याला भाजप कधीही डावलत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कृष्णराज महाडिक यांच्या संघटन कौशल्याची आणि तरुण वर्गातील लोकप्रियतेची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा (भाजयुमो) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे.
या जबाबदारीचे महत्त्व:
- राज्याचे नेतृत्व: आता कृष्णराज महाडिक केवळ कोल्हापूरपुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रातील भाजपच्या युवा फळीचे नेतृत्व करणार आहेत.
- तरुणांना साद: सोशल मीडिया आणि मैदानी कार्यात सक्रिय असलेल्या कृष्णराज यांच्यामुळे भाजपला राज्यातील तरुण मतदारांना जोडणे सोपे होणार आहे.
- टीकाकारांना उत्तर: ज्यांनी माघारीवरून टीका केली होती, त्यांना या नियुक्तीने सडेतोड उत्तर मिळाले आहे.
महाडिक परिवाराची ताकद वाढली
खासदार धनंजय महाडिक यांच्यानंतर आता युवा नेतृत्वाच्या रूपाने कृष्णराज महाडिक यांनी राज्याच्या राजकारणात मोठी झेप घेतली आहे. “पक्षाने दिलेली ही संधी म्हणजे निष्ठेचे फळ असून, येणाऱ्या काळात राज्यातील युवकांना भाजपशी जोडण्यासाठी कृष्णराज महाडिक कटिबद्ध आहे,” अशी प्रतिक्रिया कृष्णराज महाडिक यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत आहे.



