महाराष्ट्रराजकीय

KMC Election प्रभाग क्र १७-घड्याळाच्या अनपेक्षित एन्ट्रीने भाजपचे कमळ गायब..!

कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिका (KMC Election) निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १७ हा सध्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. या प्रभागात काँग्रेसने खेळलेल्या एका चाणाक्ष डावामुळे महायुती पूर्णपणे चक्रव्यूहात अडकली आहे. काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली असताना, महायुतीने मात्र भाजपच्या या बालेकिल्ल्यात चक्क राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) सर्वच्या सर्व चार जागा सोडून सर्वांनाच चकित केले आहे.

काँग्रेसचे ‘अर्ली बर्ड’ नियोजन
आमदार सतेज पाटील यांनी या प्रभागासाठी खूप आधीच आपली रणनीती स्पष्ट केली होती. काँग्रेसने आपले चारही उमेदवार निवडणूक घोषित होताच मैदानात उतरवले. या प्रभागाची संपूर्ण जबाबदारी सतेज पाटील यांनी आपले विश्वासू सहकारी प्रवीण केसरकर यांच्यावर सोपवली आहे. केसरकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ‘हात’ चिन्हाचा प्रचार घराघरांत पोहोचवून मोठी आघाडी घेतली आहे.

भाजपचा गड, पण चिन्ह ‘घड्याळ’!

प्रभाग १७ हा कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात येतो, जिथे भाजपची मोठी ताकद आहे. या प्रभागातून भाजपचे अनेक पदाधिकारी निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, महायुतीच्या जागावाटपाच्या घोळात हा प्रभाग राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला. परिणामी, भाजपचे पदाधिकारी आता राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ’ चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.

यामुळे निर्माण झालेले पेच: कार्यकर्त्यांमध्ये संताप: निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांना आपल्या नेत्याचा प्रचार ‘घड्याळ’ चिन्हावर करणे जड जात आहे. हा धक्का महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांना बसला आहे.

  • चिन्हाची अडचण: भाजपचा पारंपरिक मतदार ‘घड्याळ’ चिन्हाला स्वीकारणार का? हा मोठा प्रश्न महायुतीसमोर उभा ठाकला आहे. हे चिन्ह मतदारांच्या गळी उतरवताना नेत्यांची अक्षरशः ‘नाकीनऊ’ येत आहेत.
  • काँग्रेसचा फायदा: महायुतीमध्ये तिकीट वाटपावरून जो गोंधळ झाला, त्याचा थेट फायदा काँग्रेसला मिळाला असून त्यांनी प्रचारात बाजी मारली आहे.

‘अभद्र’ तिकीट वाटपाची चर्चा
प्रभागात सध्या या अनपेक्षित जागावाटपाला ‘अभद्र’ मानले जात आहे. एकाच पक्षाला (राष्ट्रवादीला) सर्व चार जागा देण्यामागे काँग्रेसने रचलेला डाव यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे. प्रवीण केसरकर यांनी ज्या पद्धतीने काँग्रेसच्या चारही ‘हात’ चिन्हाच्या उमेदवारांसाठी मोर्चेबांधणी केली आहे, त्यापुढे महायुतीचे ‘चक्रव्यूह’ कमकुवत ठरत असल्याचे चित्र आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांचा हा त्याग महायुतीला विजय मिळवून देणार की काँग्रेसचा ‘हात’ या गोंधळाचा फायदा घेऊन बाजी मारणार? प्रभाग १७ मधील या विचित्र राजकीय समीकरणाचा निकाल काय लागणार, याकडे संपूर्ण कोल्हापूरचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button